सोलापूरवर अन्याय? चिपी, नांदेड, संभाजीनगरसाठी विमाने वळविल्याचा दावा
सोलापूर, 30 जून (हिं.स.)। राज्यातील काही शहरांत नव्याने विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींमुळे सोलापूर येथील विमानसेवा काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपलब्ध विमानांची संख्या मर्यादित असल्याने छ
Airport Solapur Today


सोलापूर, 30 जून (हिं.स.)। राज्यातील काही शहरांत नव्याने विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींमुळे सोलापूर येथील विमानसेवा काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपलब्ध विमानांची संख्या मर्यादित असल्याने छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांवर दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्याचे कारण देत विमान कंपन्यांनी सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई या दोन्ही मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र, गेल्या वर्षी अधिक पाऊस होऊनही किरकोळ अडथळे वगळता विमानसेवा नियमित सुरू होती. त्यामुळे यंदा केवळ दृश्यमानतेचे कारण देऊन सेवा बंद करण्याचा निर्णय संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

सोलापूर-गोवा विमानसेवा १८ जूनपासून बंद करण्यात आली, तर सोलापूर-मुंबई विमानसेवाही ३० जूनपासून स्थगित झाली आहे. दरम्यान, १६ सप्टेंबरपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार असून त्यासाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, दोन्ही मार्गांवरील विमानसेवांना सुमारे ८५ टक्के प्रवासी प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, प्रादेशिक हवाई संपर्क योजनेअंतर्गत काही रिक्त जागांसाठी सरकारकडून विमान कंपनीला अनुदानही दिले जाते. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सेवा बंद करण्यामागे केवळ कमी दृश्यमानता हेच कारण असल्याबाबत प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, सोलापूरची विमानसेवा बंद ठेवून इतर शहरांत नव्याने सेवा सुरू करण्यामागे शासनाचे धोरण असल्याचा दावा काही सूत्रांकडून केला जात असला, तरी याबाबत शासन किंवा संबंधित विमान कंपन्यांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande