छ. संभाजीनगर : विद्यार्थी प्रवेश प्रक्रियासाठी जात वैधता प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीमेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.)राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवून द
छ. संभाजीनगर : विद्यार्थी प्रवेश प्रक्रियासाठी जात वैधता प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीमेचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.)राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम दिनांक २६ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले आणि १२ वी नंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये अनुसूचित जाती (SC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ccvis.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून, त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित (Self-attested) प्रती जोडाव्यात. सदर कागदपत्रे तत्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात जमा करावीत.या मोहिमेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर समितीकडून तातडीने कार्यवाही केली जाईल. तसेच, संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन. डॉ. दीपक खरात, जिल्हा जात पडताळणी समिती,छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande