
अमरावती, 30 जून (हिं.स.) : शहरातील सर्व कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अग्निसुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी दिले. फायर ऑडिट ही केवळ औपचारिकता नसून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या संरक्षणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहरातील विविध कोचिंग क्लासेसच्या संचालकांशी संवाद साधत आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, नियमित फायर ऑडिट आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक तयारी यावर भर दिला.
बैठकीत सर्व कोचिंग क्लासेसनी आपल्या इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग स्पष्टपणे दर्शविणे, विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे, आग लागल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवणे तसेच कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फायर ऑडिटदरम्यान तपासण्यात येणाऱ्या निकषांची माहिती देत इमारतींची रचना, विद्युत सुरक्षा, अग्निशामक यंत्रांची कार्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, आपत्कालीन जिने, सूचना फलक आणि बचाव व्यवस्थेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच फायर ऑडिटमध्ये आढळणाऱ्या त्रुटी निश्चित कालावधीत दूर करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी विविध कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी फायर ऑडिट प्रक्रियेसंदर्भातील शंका उपस्थित केल्या. त्यावर महापालिका आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि सुरक्षा मानकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक संचालक (नगररचना) सागर वानखडे, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे तसेच अमरावती शहरातील विविध कोचिंग क्लासेसचे संचालक उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी