
लातूर, 30 जून, (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत गंभीर तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संदिप धुमाळे माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शाळेत सुमारे ८० विद्यार्थिनी उपस्थित असताना केवळ एकच शिक्षक उपस्थित असल्याची घटना घडली असून एका शिक्षिकेने रजेचा अर्ज दिला असला तरी त्या रजेला अधिकृत मंजुरी मिळाल्याची नोंद नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरूर अनंतपाळ यांनाही देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis