चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर कोसळले झाड; विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबई, 30 जून, (हिं.स.)। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये मंगळवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. चेंबूरमधील रोड क्रमांक 11 परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले मोठे पिंपळाचे झाड उन्मळून थेट युनिव्हर्सल हायस्कूलच्या शाळेच्या बस
Tree Collapses on School Bus in Chembur Student Dies


मुंबई, 30 जून, (हिं.स.)। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये मंगळवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. चेंबूरमधील रोड क्रमांक 11 परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले मोठे पिंपळाचे झाड उन्मळून थेट युनिव्हर्सल हायस्कूलच्या शाळेच्या बसवर कोसळले. या भीषण अपघातात 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर इतर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी 2.58 वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि पालिकेची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. हेरिटेज प्राईड इमारतीजवळ रस्त्यालगत असलेले पिंपळाचे झाड उन्मळून युनिव्हर्सल हायस्कूलच्या फोर्स कंपनीच्या बसवर कोसळले होते. बसचा नोंदणी क्रमांक एमएच-03/सीव्ही-7439 असा आहे.

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 12 विद्यार्थी होते. झाड कोसळताच बसचे मोठे नुकसान झाले. मात्र बसचालक, वाहक आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीने सर्व 12 विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर अग्निशमन दलानेही घटनास्थळी बचाव मोहीम हाती घेतली. झाडाचा मोठा आणि जड भाग हटवण्यासाठी जेसीबी तसेच अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून बाजूला करण्यात आल्या.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकांमधून झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून गंभीर जखमी झालेल्या 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याला डॉक्टरांनी सायंकाळी 4.23 वाजता मृत घोषित केले.

या घटनेमुळे चेंबूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेची सविस्तर चौकशी सुरू असून झाड उन्मळून पडण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande