
सोलापूर, 30 जून (हिं.स.) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाला दिले आहेत.
काल झालेल्या अतिवृष्टीमुळे ५४ मीटर रस्ता येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नगर अभियंता सारिका आकूलवार आणि सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेतली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचना देत ५४ मीटर रस्ता परिसरात आवश्यक पंप, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील पाणी साचणाऱ्या इतर संवेदनशील ठिकाणीही आपत्कालीन यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला.
नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागांतील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड