
सोलापूर, 30 जून (हिं.स.) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची सुविधा मंदिर समितीकडून भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, १ ते ९ जुलै या कालावधीतील पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीला मंगळवार, ३० जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. तुळशी अर्चन पूजेसाठी २,१०० रुपये देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. गर्दीचे तसेच प्रमुख सण-उत्सवाचे दिवस वगळून या कालावधीत भाविकांना पूजेची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करताना अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत नोंदणीसाठी मदत तसेच आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. पूजेसंदर्भातील अटी, शर्ती आणि इतर सविस्तर माहिती मंदिर समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीशी संपर्क साधावा, असे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड