

रायगड, 30 जून (हिं.स.) : अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसामुळे श्रीवर्धन शहरातील वाणी आळी परिसर पुन्हा एकदा जलमय झाला. मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिक, व्यापारी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येची यंदाही पुनरावृत्ती झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच अन्य वाहनचालकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला, तर पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत रस्ता ओलांडावा लागला. बाजारपेठेतील अनेक दुकानांसमोर पाणी साचल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला.
स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि गटारांची स्वच्छता प्रभावीपणे न झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर साचले. गटारांची अपुरी क्षमता, नाल्यांमध्ये साचलेला गाळ व कचरा तसेच जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी यामुळे ही समस्या दरवर्षी अधिक गंभीर होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाणी आळी परिसरात प्रत्येक पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई व प्रतिबंधात्मक कामांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रत्येक पावसात वाणी आळीचे तलावात रूपांतर होते; मात्र प्रशासनाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेळ कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वाणी आळीतील जलनिस्सारण व्यवस्था तातडीने सक्षम करून नालेसफाई नियमित व प्रभावीपणे करण्यात यावी, तसेच भविष्यात ही समस्या कायमची दूर करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)