आषाढीपूर्वी रेल्वे सज्ज; सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन आणि प्रवासी सुविधांचा आढावा
सोलापूर, 30 जून (हिं.स.) आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभाग सज्ज झाला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी दोन दिवसांचा पाहणी दौरा करून सुरक्षा व्यवस्था, प्रवा
sdfg


सोलापूर, 30 जून (हिं.स.) आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभाग सज्ज झाला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी दोन दिवसांचा पाहणी दौरा करून सुरक्षा व्यवस्था, प्रवासी सुविधा आणि पायाभूत कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या दौऱ्यात त्यांनी लातूर रोड–कुर्डुवाडी–मिरज या सुमारे ३८५ किलोमीटर रेल्वे मार्गाची पाहणी केली. यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाची तयारी, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अन्य प्रवासी सुविधांवर विशेष भर देण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी दिल्या. याशिवाय लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, वॉशिंग-कम-पिट लाईन आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.

लातूर रोड–कुर्डुवाडी–मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासह नवीन ब्लॉक स्थानके आणि कुर्डुवाडी जंक्शनवरील इंजिन रिव्हर्सल टाळण्यासाठी प्रस्तावित कॉर्ड लाईन प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांचा वेग वाढण्यास आणि विलंब कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. कुर्डुवाडी येथे महाव्यवस्थापकांनी 'कवच' सुरक्षा प्रणाली कार्यालय आणि टीआरडी डेपोला भेट देऊन आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

रेल्वेने विकसित केलेल्या सेक्शन इन्सुलेटर अलाइनमेंट जिग आणि टॉवर वॅगनमधील अँटी-थेफ्ट अलार्म या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच पूल, बोगदे आणि सिग्नलिंग यंत्रणेची पाहणी करून सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी येडशी रेल्वे स्थानकावरील सुविधांचेही त्यांनी कौतुक करत तेथील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande