अमरावतीत कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांची पडताळणी सुरू; 2.75 लाख थकबाकीदार
अमरावती, 4 जून (हिं.स.) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणा
जिल्ह्यात पावणेतीन लाख थकबाकीदार शेतकरी


अमरावती, 4 जून (हिं.स.) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याबाबतची अंतिम यादी लवकरच स्पष्ट होणार आहे.

प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 2 लाख 75 हजार 292 शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्या नावावर तब्बल 3,137 कोटी 4 लाख 57 हजार रुपये इतके पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे या मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांपैकी नेमके किती जणांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासन निर्णयानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पात्र अल्पमुदत पीककर्जांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून बँकांमार्फत माहिती संकलन सुरू असून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 73 हजार 125 थकबाकीदार असून त्यांच्याकडे 798 कोटी 31 लाख 59 हजार रुपये इतकी थकबाकी आहे. तर राष्ट्रीयीकृत व इतर बँकांमध्ये 2 लाख 2 हजार 167 शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्याकडे 2,338 कोटी 72 लाख 98 हजार रुपये इतकी थकबाकी आहे.

आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी, कर्जाचा प्रकार आणि इतर निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अंतिम लाभार्थी संख्या पडताळणीनंतरच निश्चित होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande