
नांदेड, 04 जून (हिं.स.)।
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मंजूर झालेला पीकविमा अद्यापही खात्यात जमा झालेला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पेरण्या तोंडावर आल्या असताना शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे मंजूर पीकविमा तात्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
याबाबत तहसीलदार, नायगाव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनसह विविध पिकांचा पीकविमा मंजूर होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून आगामी पेरणी हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे व खते खरेदी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात डीएपी व युरिया खतांचा तुटवडा निर्माण झाला असून काही विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. डीएपी खताच्या एका बॅगसाठी ३०० ते ४०० रुपये अधिक दर आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देत काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीकविम्याची रक्कम ५ जूनपूर्वी
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व खतांचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा नांदेड जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री नांदेड तसेच कृषिमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत. सदर निवेदन नायब तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis