
नांदेड, 04 जून (हिं.स.)।
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त
अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
प्राप्त गोपनीय माहिती व नियमित तपासणीच्या आधारे मे. एम.ए. शरीफ जुना मोंढा नांदेड या आस्थापनेची तपासणी करून आस्थापनेतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 718 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 14 हजार 880 किंमतीचा अन्न पदार्थ कायद्याचे उल्लघंन करत असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे.
मे. रॉयल बेकरी, धनेगाव, ता.जि. नांदेड या पेढीतून रूपये 25 हजार 840 किंमतीचा मिल्क रस्क या मिथ्याछाप अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. रहिम किराणा दुकान माहूर या पेढीतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 358 कि. ग्रॅ. रूपये 57 हजार 280 किंमतीचा अन्न पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. भैरूनाथ आईसक्रिम अॅण्ड कुल्फी हदगाव या पेढीतून कुल्फी, मिल्कशेक या अन्न पदार्थाचा 238 लिटर, रूपये 51 हजार 900 एवढया किंमतीचा साठा अस्वच्छ वातावरणात व विनापरवाना व्यवसाय
करीत असल्यामुळे नमुना घेवून नष्ट करण्यात आलेला आहे. रविवार 31 मे रोजी मे. शोएब पान शॉप देगलूरनाका नांदेड, मे. दुर्गा पान शॉप इस्लापूर, ता. किनवट तसेच मे. साईश्रध्दा पान शॉप इस्लापूर ता. किनवट इत्यादी आस्थापनेत गुटखा पानमसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात येवून एकूण 4 व्यक्तीविरूध्द संबंधित पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढया सिल करण्यात आलेल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis