पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी
धाराशिव, ४ जून (हिं.स.) : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी आणि सिंचन प्रकल्पांतील पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या गरजांसाठी अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी


धाराशिव, ४ जून (हिं.स.) : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी आणि सिंचन प्रकल्पांतील पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या गरजांसाठी अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी दिले.जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन आणि भूजल संवर्धनासंदर्भात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ‘जलतारा खड्डे’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे निर्देश दिले. यासाठी सुधारित टंचाई निवारण आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

तसेच विहिरींमधील गाळ काढणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि बंद पडलेले हातपंप तातडीने दुरुस्त करण्याची कामे हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरींच्या परिसरात तसेच शेतामध्ये जलतारा खड्डे तयार करून पावसाचे पाणी भूगर्भात मुरवावे, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक आणि खासगी इमारतींवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठा योजनांमधील गळती तातडीने थांबविण्याचे आदेश देताना जिल्हाधिकारी पुजार यांनी नदी-नाल्यांमधील वाहते पाणी अडवण्यासाठी स्थानिक पातळीवर श्रमदानाची चळवळ उभारण्याचे आवाहन केले.

“सिमेंटच्या पोत्यांमध्ये रेती भरून नदी-नाल्यांमध्ये तात्पुरते बंधारे उभारल्यास वाहते पाणी अडवून त्याचे भूगर्भात पुनर्भरण करता येईल. यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.

बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी, असे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन धाराशिव जिल्हा प्रशासनाने जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक जलस्रोत बळकट करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामपंचायती, शेतकरी आणि नागरिकांच्या सहभागातून जलस्रोत सक्षम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande