
धाराशिव, ४ जून (हिं.स.) : संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप आणि रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणी साठवता येईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे, जिल्हा उपायुक्त डॉ. डी. एम. मुळे, वरिष्ठ वैज्ञानिक आर. व्ही. मांजरमकर, कार्यकारी अभियंते ए. एन. मदने, एम. एम. कटकधोंड, सूर्यकांत नलवडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक इमारतींवरून वाहणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले. जलस्रोत बळकट करण्यासाठी पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करून अपव्यय टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत बोलताना कीर्ती किरण पुजार यांनी इशारा दिला की, संभाव्य हवामान बदल आणि अल निनोच्या परिणामांमुळे पुढील वर्षीही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.
“भूजल पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या तर भविष्यातील पाणी संकटाची तीव्रता कमी करता येईल,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मोठ्या प्रकल्पांतील पाणी सध्या प्रामुख्याने पिण्याच्या गरजांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्यास विनाकारण विहिरी किंवा विंधन विहिरी अधिग्रहित करू नयेत.
तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींची प्रत्यक्ष गरज तपासावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
संभाव्य अल निनोच्या परिणामांचा विचार करून धाराशिव जिल्हा प्रशासनाने जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाणी व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis