विधान परिषद निवडणूक - 12 ठिकाणी थेट लढती, 5 जागा बिनविरोध
मुंबई, 04 जून (हिं.स.) - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर
विधान भवन मुंबई


महायुती मविआ


मुंबई, 04 जून (हिं.स.) - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीनं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मविआच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचं कारण, मित्रपक्षांचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत माघार घेतली. तर, महायुतीच्या नेत्यांना देखील काही बंडखोरांच बंड शमवण्यात यश आलं. त्यानंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानुसार 17 पैकी 5 जागा बिनविरोध, तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये थेट लढत होणार आहे.

मतदारसंघनिहाय तपशील

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रायगडमध्ये महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बाळ माने मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेकापच्या अरविंद म्हात्रे यांच्याकडून अर्ज मागं घेण्यात आला. पक्षविरोधी कारवाईमुळे बाळ मानेंची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं. या मतदारसंघात अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले.

पुणे : पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी माघार घेतली. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानं विक्रम काकडेंच्या बिनविरोध विजयाचा मार्ग सुकर झाला. पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले.

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो देखील त्यांनी मागे घेतला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाकी होता. शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरेंचा अर्ज मागंं घेतल्याच समोर आलं. दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज मागे घेतला नसल्याचं म्हटलं.

ठाणे : ठाण्यात शिवसेनेचे रविंद्र फाटक उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली मात्र त्यांनी देखील माघार घेतली. रविंद्र फाटक बिनविरोध विजयी झाले.

नाशिक : नाशिक स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ अर्ज मागं घेण्याच्या दिवशी चर्चेत राहिला. हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून तिथून नरेंद्र दराडे उमेदवार आहेत. भाजपच्या गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला. मात्र, गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. यामुळं या ठिकाणी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल.

यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली. त्यामुळं मविआकडून सय्यद फारूख यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु होता. मात्र, सय्यद फारुख यांनी अर्ज मागं घेतला. या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले.

सांगली सातारा : शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं शंभराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागं घेतला. या ठिकाणी धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप अशी लढत होईल.

नागपूर- नागपूरमध्ये काँग्रेसचे दुसरे क्रमांकावर असलेले उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही, राजेंद्र जंगले यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. या ठिकाणी अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार असतील.

सोलापूर : सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी माघार घेतली. सोलापूर विधानपरिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख या दोघांचेच अर्ज आहेत. नागेश अक्कलकोटे यांचा निर्णय स्पष्ट झाला नव्हता.

नांदेड : महायुतीला नांदेडमध्ये देखील बंड शमवण्यात यश आलं. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतली. याठिकाणी काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर

भंडारा-गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांची उमेदवारी कायम आहे. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर प्रफुल अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतली.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : या मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा आमने सामने आहेत.

परभणी हिंगोली : परभणीत शिंदे सेनेचे सईद खान,उबाठा सेनेचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सुशील देशमुख यांचा अर्ज या ठिकाणी कायम राहिला. तर, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

धाराशिव-लातूर-बीड : महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख निवडणूक आखाड्यात आहेत. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेतील सर्व सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

जळगाव : जळगाव विधान परिषदेसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील या उमेदवारांनी माघार घेतली असून तसेच अपक्ष उमेदवार कलीम मणियार, उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख निलेश चौधरी यांनी माघार घेतली आहे शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार दीपक धांडे, यांनी माघार घेतली आहे. शिंदेच्या सेनेच्या रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली नाही. भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि ठाकरेंच्या सेनेकडून शरद तायडे रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर-जालना : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे आमने सामने आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्यांना उमेदवारी दिलेली त्या देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातून समीर सत्तार यांनी देखील माघार घेतली.

बिनविरोध विजयी उमेदवार

1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप

2.पुणे : विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस

3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना

4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

5. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना

राज्यातील 12 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण?

1. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

2. अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)

3. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

4. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

5. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)

6. भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

7. नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)

8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )

9. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)

11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)

12. नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande