‘सॉफ्ट टेरर’द्वारे भारताला अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
नवी दिल्ली , 04 जून (हिं.स.)।भारतीय सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईमुळे अस्वस्थ झालेला पाकिस्तान आता थेट हल्ल्यांऐवजी ‘सॉफ्ट टेरर’चा मार्ग अवलंबत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या मोठ्या पराभवामुळे आणि त्या
‘सॉफ्ट टेरर’द्वारे भारताला अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न


नवी दिल्ली , 04 जून (हिं.स.)।भारतीय सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईमुळे अस्वस्थ झालेला पाकिस्तान आता थेट हल्ल्यांऐवजी ‘सॉफ्ट टेरर’चा मार्ग अवलंबत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या मोठ्या पराभवामुळे आणि त्यातून झालेली नामुष्की लपवण्यासाठी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताविरोधात नवा कट रचला आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारताविरोधात बनावट प्रचारमोहीम राबवत असल्याचे समोर आले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’ (टीटीएच) नावाची काल्पनिक आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली संघटना उभी करणे हा आहे. पाकिस्तान या कथित संघटनेचा संबंध ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी)शी जोडून ती भारताने निर्माण केल्याचा खोटा आभास जगासमोर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या पाकिस्तानमध्ये टीटीपी आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांनी सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच चीनच्या गुंतवणुकीशी संबंधित प्रकल्पांवरही सातत्याने हल्ले होत आहेत. या अपयशांवर पडदा टाकण्यासाठी आणि चीनकडून वाढत असलेल्या दबावापासून लक्ष विचलित करण्यासाठी असीम मुनीर भारतावर निराधार आरोप करत असल्याचे सांगितले जात आहे.

गुप्तचर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयएसआय भारताच्या सीमावर्ती राज्यांतील महाविद्यालयीन आणि सहज फसवता येतील अशा तरुणांना लक्ष्य करत आहे. विशेषतः अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि पैशांची गरज असलेल्या युवकांना जाळ्यात ओढले जात आहे. अशा युवकांना किरकोळ मोबदला देऊन रेल्वे स्थानके, सरकारी कार्यालये, बसस्थानके आणि महाविद्यालयांच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणाबाजी व चित्रे (ग्राफिटी) काढण्याची कामे दिली जात आहेत.

या तथाकथित ‘ग्राफिटी वॉर’चा उद्देश भारताच्या मानवाधिकार नोंदीबाबत खोट्या कथा पसरवणे तसेच काश्मीर आणि खलिस्तानसारख्या संवेदनशील मुद्द्यांना हवा देणे हा आहे. आयएसआयचा हेतू शस्त्रे किंवा स्फोटकांद्वारे हानी पोहोचवण्याचा नसून, तरुणांच्या विचारसरणीवर प्रभाव टाकण्याचा असल्याचे मानले जाते. नियमितपणे दिसणाऱ्या अशा ग्राफिटीमुळे देशात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे काही विद्यार्थी आणि तरुण हिंसक आंदोलनांच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे.तथापि, भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सीमावर्ती राज्यांमधील अशा भरती किंवा प्रचाराशी संबंधित प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande