आव्हानांचा काळ असला तरी हे भारताचे युग : कुमारमंगलम बिर्ला
नागपूर, 04 जून (हिं.स.) : जागतिक स्तरावर अनेक आर्थिक आणि तांत्रिक आव्हाने निर्माण होत असतानाही सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णसंधीचा असून हे भारताचे युग आहे, असा विश्वास उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भरता ही केवळ आर्थिक ध
कुमार मंगलम बिडला नागपुर मे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग (द्वितीय) के समापन कार्यक्रम को संबोधित करते हुए


नागपूर, 04 जून (हिं.स.) : जागतिक स्तरावर अनेक आर्थिक आणि तांत्रिक आव्हाने निर्माण होत असतानाही सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णसंधीचा असून हे भारताचे युग आहे, असा विश्वास उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भरता ही केवळ आर्थिक धोरण नसून राष्ट्रनिर्माणाचा मूलभूत आधार असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले.

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या (द्वितीय) समारोप प्रसंगी बिर्ला म्हणाले की, शतकानुशतके गुलामगिरीमुळे भारतीयांचा आत्मविश्वास खचला होता. मात्र आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकावर पोहोचली असून देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या काही वर्षांत तेलाच्या वाढत्या किंमती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या बदलांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होत असली तरी भारतासाठी हा अमृतकाळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

संघाच्या कार्याचा गौरव करताना बिर्ला यांनी सांगितले की, संघाचे स्वयंसेवक नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांच्या काळात समाजाच्या मदतीसाठी सातत्याने उभे राहिले आहेत. संघाचे शताब्दी वर्ष पूर्ण होत असताना सेवा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी म्हटले.

उद्योग क्षेत्राच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मजबूत उद्योग हे देशाच्या विकासाचा पाया असतात. कंपन्यांनी केवळ व्यावसायिक उद्दिष्टे न ठेवता मोठे राष्ट्रीय ध्येय समोर ठेवून कार्य केले पाहिजे. सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण, कौशल्यविकास आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत उद्योगांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिमेंट उद्योगाचा उल्लेख करताना बिर्ला म्हणाले की, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक देश आहे. रस्ते, घरे, शाळा आणि कारखान्यांच्या उभारणीत सिमेंटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अल्ट्रा टेक सिमेंटची उत्पादन क्षमता 60 दशलक्ष टनांवरून 200 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्याचा उल्लेख त्यांनी केला.

वित्तीय समावेशनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आदित्य बिर्ला कॅपिटलमार्फत देशातील सामान्य नागरिकांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचविण्याचे कार्य सुरू असून कर्जवाटपात मोठी वाढ झाली आहे.

यावेळी त्यांनी तरुणांना भारतात राहून जगासाठी उत्पादन तयार करा असा संदेश दिला. सध्याच्या पिढीसमोर उपलब्ध असलेल्या संधी यापूर्वी कधीच नव्हत्या, असे सांगत त्यांनी बिझनेस बिल्डिंगमधून नेशन बिल्डिंग घडते असे प्रतिपादन केले. पुढील दशकात भारत अभूतपूर्व प्रगती करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अमृतकाळात भारताचे नवनिर्माण घडवून देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बिर्ला यांनी नमूद केले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande