
नांदेड, 04 जून (हिं.स.)।
नवीन शैक्षणिक वर्ष
२०२६-२७ येत्या १५ जूनपासून सुरू होत असून, पहिल्याच दिवसापासून 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना' (माध्यान्ह भोजन योजना) प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नांदेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी शाळांनी दररोज 'एमडीएम सरल अॅप' अथवा पोर्टलवर लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन माहिती न भरल्यास इंधन व भाजीपाला अनुदान रोखण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शाळांच्या बँक खात्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वयंपाकी व मदतनीस यांच्याशी नवीन करारनामा बॉन्डपेपरवर करण्याबरोबरच त्यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.. त्यांच्या मानधनाची देयके दर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. धान्य पुरवठा व साठवणुकीबाबतही विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये किमान १५ दिवसांचा बफर स्टॉक राखणे, धान्याची प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि आवश्यकतेनुसारच साठा स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.. विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या मेनूनुसार भोजन देणे, प्रत्येक शुक्रवारी पूरक पोषण आहारासह इडली सांबार देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis