
अमरावती, ४ जून (हिं.स.) : आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अमरावतीतील पालकांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंधन दरवाढ, वाहन विमा आणि विविध प्रशासकीय शुल्कांमध्ये झालेल्या वाढीमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व व्हॅन चालकांच्या संघटनेने याबाबत संकेत दिले असून, नव्या शैक्षणिक सत्रापासून पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
अमरावती शहर व ग्रामीण भागात सध्या सुमारे ६०० हून अधिक स्कूल बस आणि व्हॅन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. दहा विद्यार्थी क्षमतेच्या व्हॅनपासून ते ३५ ते ५० विद्यार्थी क्षमतेच्या बसपर्यंत विविध वाहनांचा वापर केला जातो.
यापैकी काही वाहने खासगी विनाअनुदानित शाळांच्या मालकीची असली तरी मोठ्या प्रमाणावर स्वतंत्ररित्या बस व व्हॅन सेवा चालविण्यात येतात. स्कूल बस व व्हॅन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी कठोरा ते इर्विन चौक या मार्गावरील शाळेसाठी मासिक भाडे सुमारे १,५०० रुपये असेल, तर ते यंदा १,८०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
त्याचप्रमाणे बडनेरा ते इर्विन चौक मार्गावरील १,२०० रुपयांचे भाडे १,५०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक संघाचे अध्यक्ष बंडू कथिलकर यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. त्याचबरोबर वाहन पासिंग शुल्क, विमा प्रीमियम आणि देखभाल खर्चातही मोठी वाढ झाली आहे.
“केवळ इंधन दरच वाढलेले नाहीत, तर वाहनांच्या नियमित देखभालीसाठी लागणारा खर्चही लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे यंदा काही प्रमाणात भाडेवाढ करणे अपरिहार्य ठरणार आहे,” असे कथिलकर यांनी स्पष्ट केले.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी गृहविभागाने विविध नियमावली लागू केली आहे. मात्र या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे अनेक वाहनचालक आणि मालकांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचेही चित्र आहे.
दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडून शालेय वाहनांची तपासणी आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. यंदाही शाळा सुरू होण्यापूर्वी या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची शक्यता असताना शालेय शुल्क, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक खर्चांबरोबरच वाहतूक शुल्कातही वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे यंदा पालकांच्या आर्थिक ताणात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी