
नांदेड, 04 जून (हिं.स.)।
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने
लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी येत्या १० जूनपासून धर्माबाद ते मुंबई भव्य पदयात्रा काढण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर धर्माबाद येथे महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पदयात्रेचा आराखडा, मार्गक्रमण, जनसंपर्क मोहीम, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच पुढील आंदोलनाची दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने अनुसूचित जाती समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, या उद्देशाने मुंबई येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समान प्रतिनिधित्वासाठी आणि आरक्षणातील समतोल लाभ सुनिश्चित करण्यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी धर्माबाद तालुक्यासह जिल्हाभरातून युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यासाठी गावोगावी संपर्क अभियान, बैठका, जनसंवाद आणि संघटनात्मक तयारीला गती देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
धर्माबाद ते मुंबई पदयात्रा ही केवळ आंदोलन नसून न्याय, समानता आणि सामाजिक हक्कांसाठी उभारलेला लोकशाही लढा आहे. समाजातील युवक, महिला आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन लोकस्वराजचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही. जी. डोईवाडे यांनी केले आहे.
उपवर्गीकरणाची अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक प्रतिनिधी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis