
छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)।
'नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पीजी कोर्स प्रमाणेच पदवी स्तरावरचे अभ्यासक्रम देखील विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरु होत आहेत. तसेच एज्युकेशन एक्स्पो ’प्रज्ञावेध-२०२६’, ’ओपन डे’च्या माध्यमातून विद्यापीठाच्या क्षमतांचे दर्शन होईल, असे प्रतिपादन प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या ५ व ६ जून रोजी ’एज्युकेशन एक्स्पो-प्रज्ञावेध-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.गणेश मंझा, ’युनिक’चे संचालक डॉ.प्रवीण यन्नावार, डॉ.संजय शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते म्हणाले, सन २०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून यंदा अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम, व्यवसायाभिमूख अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम होणार आहेत. विद्यापीठांतील विभागांची क्षमता, संशोधन, अभ्यासक्रम , रोजगाराच्या संधी या संदर्भात विद्यार्थी, पालकांना विस्तृत माहिती व्हावी, या उद्देशाने ’एज्यूकेशन एक्स्पो, प्रज्ञावेध-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुख्य कॅम्पसमधील ४५ विभाग, धाराशिव उपपरिसरातील १० विभागांची दालने असणार आहेत. तसेच विद्यापीठ ग्रंथालय, बजाज इन्क्युबूशन सेंटरची दालनेही असणार आहेत. विद्यापीठ नाटयशास्त्र विभागाच्या शेजारील नवीन नाटयगृहात ६० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.पाच) सकाळी १०ः३० वाजता उद्घाटन होईल. यावेळी सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. ’एज्युकेशन एक्सपो’ ५ व ६ जून रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत सुरु राहणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis