अमरावती महापालिकेकडून जनगणना तयारीला वेग
अमरावती, ४ जून (हिं.स.) : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तयारीला गती दिली असून झोननिहाय आढावा बैठकीद्वारे कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न
जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश


अमरावती, ४ जून (हिं.स.) : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तयारीला गती दिली असून झोननिहाय आढावा बैठकीद्वारे कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे, सहाय्यक शहर जनगणना अधिकारी अक्षय निलंगे तसेच विविध झोनचे पर्यवेक्षक उपस्थित होते.बैठकीत पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जनगणना संचालनालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील सूचनांच्या अंमलबजावणीवर विशेष चर्चा करण्यात आली.आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाची माहिती अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. क्षेत्रीय स्तरावर प्रगणकांनी भरलेल्या माहितीची काटेकोर पडताळणी करून आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रगणक, पर्यवेक्षक आणि चार्ज अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित

बैठकीत जनगणना प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक आणि चार्ज अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. प्रगणकांकडून संकलित होणाऱ्या माहितीची दैनंदिन तपासणी पर्यवेक्षकांनी करावी, तर चार्ज अधिकाऱ्यांनी माहितीचे नियमित परीक्षण करून कोणतीही अपूर्ण किंवा चुकीची माहिती प्रणालीवर अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.महापालिका प्रशासनाने प्रत्येक गटाचे क्षेत्रीय काम ५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय आणि पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला. सर्व चार्ज अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे काम वेळेत पूर्ण होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

नियमित ‘डेटा सिंक’ करण्याच्या सूचना

प्रगणकांनी क्षेत्रातून गोळा केलेली माहिती वेळेवर प्रणालीमध्ये ‘सिंक’ करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. माहिती संकलनानंतर ती तातडीने अद्ययावत न झाल्यास डेटामध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व पर्यवेक्षकांनी प्रगणकांना नियमितपणे डेटा सिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले.

जनगणना कार्यातील अचूकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक पर्यवेक्षकाने दररोज सायंकाळी आपल्या अधिनस्त प्रगणकांची बैठक घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या बैठकीत दिवसभरातील कामाचा आढावा, आलेल्या अडचणी, माहितीची गुणवत्ता आणि डेटा सिंकची स्थिती तपासण्यावर भर देण्यात येणार आहे.

क्षेत्रभेटीद्वारे माहितीची खातरजमा

चार्ज अधिकाऱ्यांना त्यांच्या झोनमधील संपूर्ण डेटा तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि प्रणालीमध्ये नोंदविलेली माहिती यामध्ये सुसंगती असल्याची खात्री करण्याचे आदेशही देण्यात आले.बैठकीच्या शेवटी आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना कार्य ही अत्यंत जबाबदारीची आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया असल्याचे अधोरेखित केले. अचूक माहिती संकलन, नियमित डेटा सिंक, सातत्यपूर्ण पडताळणी आणि वेळेत काम पूर्ण करणे या चार बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande