पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई; मुख्य पुरवठादार पिता-पुत्र अटकेत
पुणे, 04 जून (हिं.स.) : दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महत्त्वाची कारवाई करत दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे. सीआयडीच्या पुणे पथका
पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई; मुख्य पुरवठादार पिता-पुत्र अटकेत


पुणे, 04 जून (हिं.स.) : दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महत्त्वाची कारवाई करत दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे. सीआयडीच्या पुणे पथकाने नवी मुंबईतील वाशी गावातून ही कारवाई केली.

अरुण जगदंब चौबे (वय 59) आणि अभिषेक अरुण चौबे (वय 34, दोघेही रा. वाशीगाव, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या पिता-पुत्राला पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि पुण्यातील हडपसर परिसरात विषारी हातभट्टीची दारू प्राशन केल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना विषबाधा झाली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्यानंतर तपास यंत्रणेने कारवाईचा वेग वाढविला आहे.

तपासासाठी सीआयडीने दहा विशेष पथके तयार केली असून त्यांनी विविध ठिकाणी भेटी देत पुरावे संकलित केले आहेत. पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, दारूचे नमुने तसेच इतर तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत. जप्त केलेले नमुने तपासणी आणि विश्लेषणासाठी पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.या प्रकरणातील संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि अन्य संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande