
छत्रपती संभाजीनगर, ४ जून (हिं.स.) : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेतील विविध कामकाजांचा समन्वय, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, मतदान, मतमोजणी, निवडणूक साहित्य वितरण, माध्यम व्यवस्थापन आणि विविध परवानग्यांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे आदर्श आचारसंहिता (एमसीसी) नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे हे निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी म्हणून कार्य पाहणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील. त्यांच्या अखत्यारित नामनिर्देशन स्वीकृती कक्ष, कायदा व सुव्यवस्था आणि वाहन व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मतमोजणी, कर्मचारी व्यवस्थापन आणि प्रशिक्षणावर भर
उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे मतमोजणी कक्ष उभारणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे या मतदान अधिकारी आणि कर्मचारी व्यवस्थापन कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.तसेच उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरुणा गायकवाड यांच्याकडे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प) संतोष राऊत यांच्याकडे निवडणूक साहित्य वितरण आणि स्ट्राँगरूम व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीणकुमार धरमकर हे मतपत्रिका छपाई आणि वितरणाचे कामकाज सांभाळणार आहेत.
अवैध दारू वितरण रोखण्यासाठी विशेष कक्ष
निवडणूक काळात अवैध दारू वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्याकडे विशेष प्रतिबंध कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे माध्यम व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) तसेच मीडिया व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील. तर तहसीलदार (संगायो) दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे विविध परवानग्या आणि चौकशी कक्ष (एक खिडकी योजना) यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत आणि नियमांनुसार पूर्ण व्हावा, तसेच विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखला जावा यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोडल अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून, उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणूक निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis