
पुणे, 04 जून (हिं.स.)। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 7 जुलै 2026 रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे आदी उपस्थित होते.
विक्रमसिंह महाराज मोरे यांनी सांगितले की, 7 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथील देऊळवाड्यातून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम इनामदारवाडा, देहू येथे असेल. 8 जुलै रोजी पालखी आकुर्डी येथे मुक्कामी राहील. 9 जुलै रोजी पिंपरी व कासारवाडी मार्गे पालखी पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल होईल. येथे दोन दिवस मुक्काम असेल. 11 जुलै रोजी सोहळा हडपसरमार्गे लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती नवीन पालखी तळावर मुक्कामी जाईल. 12 जुलैला यवत, 13 जुलैला वरवंड, 14 जुलैला उंडवडी गवळ्याची आणि 15 जुलैला बारामती येथे पालखी मुक्कामी असेल. 16 जुलै रोजी सणसर येथे मुक्काम असून काटेवाडी येथे मेंढ्याचे रिंगण पार पडेल.
आगामी 17 जुलै रोजी बेलवाडी येथे सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार असून त्यानंतर पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी राहील. 18 जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल. 19 जुलै रोजी पालखी सराटी येथे मुक्कामी असेल.
नीरा स्नानानंतर 20 जुलै रोजी अकलूज येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल. 21 जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होणार असून त्यानंतर पालखी बोरगाव येथे मुक्कामी जाईल. 22 जुलै रोजी तोंडले-बोंडले येथे पारंपरिक धावा होईल आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी राहील. 23 जुलै रोजी वाखरीजवळील बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पडेल.
त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी असेल. 24 जुलै रोजी पादुका अभंग आरती व उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरातील संत तुकाराम महाराजांच्या नवीन मंदिरात दाखल होईल. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होणार असून प्रशासनाकडून आवश्यक नियोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु