
सोलापूर, 04 जून (हिं.स.)प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सर्व्हेक्षणाला माळशिरस तालुक्यात तीव्र विरोध होत असताना प्रशासनाने गुरुवारी पहाटे मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली. महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी सर्व्हेक्षणासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे सुपीक शेती, घरे आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. सर्व्हेक्षणासाठी प्रशासनाचे पथक येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकरी विरोधासाठी सज्ज झाले होते.
याच पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पहाटेपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. निमगाव व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये अजित बोरकर, के. के. पाटील यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना अकलूज पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा माजी खासदार राजू शेटटी यांनी तीव्र निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा लोकशाही मार्गाने विचार करण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली.महामार्ग सर्व्हेक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड