
नवी दिल्ली, 04 जून (हिं.स.)बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. दक्षिण भारतातील या राज्यात बऱ्याच काळापासून पाऊस सुरू होता, पण आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात १ जूनला मान्सूनचं आगमन होणार होतं.
पुढील 2-3 दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रातील काही भाग व्यापू शकतात, अशी भारतीय हवामान विभागाची माहिती आहे. पुढील 2-3 दिवसांत गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, सोबतच तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागराचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
साधारणपणे नैर्ऋत्य मोसमी पाऊस १ जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. मात्र यंदा समुद्रावरील आणि वातावरणातील काही बदलांमुळे त्याच्या आगमनाला काही दिवसांचा विलंब झाला. अखेर गुरुवारी आवश्यक हवामानविषयक निकष पूर्ण झाल्यानंतर हवामान विभागाने मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पावसाने अरबी समुद्रातील दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भाग, मध्य अरबी समुद्रातील काही भाग, लक्षद्वीप बेटे, केरळ आणि माहेचा संपूर्ण प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडूचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागरातील विस्तृत क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाळ्याची औपचारिक सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने सुरुवातीला असा अंदाज वर्तवला होता की, केरळमध्ये मान्सून २६ मे पर्यंत दाखल होऊ शकतो. तेव्हा चार दिवसांचा विलंब किंवा लवकर आगमन होण्याचाही अंदाज वर्तवला होता. पावसाळा ३० मे पर्यंत सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. तरीही मान्सूनला विलंब झाला. इतकेच नव्हे तर मान्सून नेहमीच्या १ जूनच्या तारखेला दाखल झाला नाही, त्यामुळे पावसाला चार दिवसांचा उशीर झाला.
गुरुवारी सकाळी केरळच्या अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पत्तनमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यात पावसाच्या सौम्य ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
केरळसह तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यात पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळच्या अनेक भागात आधीच जोरदार पाऊस सुरू आहे. ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तेलंगणासह २४ राज्यांमध्ये पाऊस आणि वेगवान वारे वाहतील असं हवामान खात्याने सतर्क केले आहे. हवामानातील बदलामुळे आजही गुजरात, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान ४० डिग्री सेल्सिअसपुढे आहे. महाराष्ट्रात पुढील २ दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. ६ ते ७ तारखेला मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात पावसाला सुरुवात होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे