गडचिरोलीत मुलाकडून वडिलांची हत्या
गडचिरोली, ५ जून (हिं.स.) : किरकोळ कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण आशा टे
आरोपी मुलगा


गडचिरोली, ५ जून (हिं.स.) : किरकोळ कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण आशा टेकाम (वय ६१) हे मजुरीचे काम करणारे वयोवृद्ध व्यक्ती होते. ४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १० ते ११.५० वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मोठा मुलगा विजय नारायण टेकाम (वय ४०) हा दारूच्या नशेत घरी आला.

दारूच्या नशेत त्याने वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत जाऊन आरोपीने घरात असलेल्या लाकडी दांड्याने वडिलांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने नारायण टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृतकाचे भाऊ तुळशीराम आशा टेकाम यांनी ५ जून रोजी अहेरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विजय नारायण टेकाम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळ अहेरी पोलीस ठाण्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande