
अमरावती, 13 जून (हिं.स.) येथील बाजार समितीतून एका व्यापाऱ्याने खरेदी केलेले २०० क्विंटल सोयाबीन घेऊन निघालेला ट्रक सोलापूरला पोहचलाच नाही. हा माल ट्रकचालकानेच गायब केल्याचा संशय असल्यामुळे व्यापाऱ्याने गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील तक्रारदार मनीष सतीश भट्टड (३७, रा. धामणगाव रेल्वे) यांनी येथील बाजार समितीमधील पाच अडत व्यापाऱ्यांकडून ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने एकूण २०० क्विंटल सोयाबीन खरेदी केले. त्यांना हा शेतमाल ऑर्डप्रमाणे सोलापूर येथील कंपनीला पाठवायचा होता. त्यासाठी त्यांनी एक ट्रक सांगितला. ट्रकमध्ये सोयाबीन भरून तो सोलापूरकडे रवाना करण्यात आला. ट्रक रवाना होण्यापूर्वी भट्टड यांनी चालकाला त्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक विचारला होता. त्यावर चालकाने आपले नाव सांगून मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर भट्टड हे धामणगाव रेल्वेला निघून गेले. दरम्यान, ७ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ट्रक कुठपर्यंत पोहोचला, हे पाहण्यासाठी भट्टड यांनी ट्रकचालकाच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचा मोबाइल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी तातडीने सोलापूर येथील संबंधित कंपनीशी संपर्क साधून चौकशी केली. तेव्हा तिथे शेतमाल पोहोचलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे आणि ट्रकचालकानेच माल लांबविल्याचे लक्षात आल्यावर भट्टड यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी