
नांदेड, 1 जुलै (हिं.स.) : उमरी येथील मातोश्री ॲग्रो एजन्सी या कृषी निविष्ठा केंद्राची कृषी विभागाने तपासणी करून खताची पाहणी केली असता संबंधित खतामध्ये वाळू अथवा रेतीची भेसळ नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उमरीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) आर. के. लखमोड तसेच पंचायत समिती, उमरीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) ए. सी. जोंधळे यांनी तपासणी केली. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या क्लासवन ॲग्रो बायोटेक अँड फर्टीलायझर प्रा. लि., येळावी (ता. तासगाव, जि. सांगली) या कंपनीच्या क्लास वन झिंकेटेड सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार खताची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान खतामध्ये वाळू किंवा रेतीचे कण आढळून आले नाहीत. तसेच खताचे दाणे फोडून पाहिल्यानंतर ते बारीक पिठामध्ये रूपांतरित झाल्याने त्यामध्ये वाळूची भेसळ नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, सदर खताचे नमुने घेऊन पुढील रासायनिक विश्लेषणासाठी फर्टिलायझर टेस्टिंग लॅबोरेटरी, छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहेत. संबंधित खत उत्पादक कंपनी ही कृषी आयुक्तालयाकडून राज्यस्तरीय खत उत्पादन परवानाधारक कंपनी असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कुठेही अनधिकृत खत विक्री, रासायनिक खतांची जादा दराने किंवा विनापरवाना विक्री होत असल्याचे अथवा उपलब्ध खताची विक्री नाकारली जात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis