

रायगड, 01 जुलै, (हिं.स.)। रायगड हा शेतीप्रधान जिल्हा असून शेतकऱ्यांच्या प्रगतीतूनच देशाचा विकास शक्य आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी आणि फलोत्पादन योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने अधिक प्रभावीपणे काम करावे, असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले. रायगड जिल्हा परिषद कृषी विभाग आणि अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आ. दळवी यांनी रायगडमध्ये वाढत असलेल्या फळबाग लागवडीचा उल्लेख करत सुपारी, नारळ आणि इतर फळपिकांना पूरक उद्योग विकसित करण्याची गरज व्यक्त केली. तसेच जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी आधुनिक शेती, शासकीय योजनांचा लाभ आणि युवकांनी शेतीकडे वळण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
प्रगतशील शेतकरी तथा मिशन ऑर्गेनिक भारत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल टोपले यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व स्पष्ट करत शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात कृषी योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषीदिनानिमित्त आयोजित या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)