
बीड, 01 जुलै (हिं.स.) : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणातील इतर साथीदारांना तात्काळ अटक करावी तसेच सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात मृत विलास घुले यांच्या पत्नी, तसेच रमेश घुले आणि उमेश माने यांचा समावेश आहे. जोपर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः आंदोलनस्थळी येऊन मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत टाकीवरून खाली न उतरण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांमध्येही या प्रकरणावरून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
कुटुंबीयांनी आणखी एक मागणी करत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कदम नावाच्या महिलेने केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis