
बीड, 01 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित स्मार्ट वेअरेबल उपकरणांच्या संभाव्य गैरवापराचा आणि महिला सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर सरकारचे लक्ष वेधले.
महिला, विद्यार्थिनी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धोरणाची वाट न पाहता तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. स्मार्ट ग्लासेस आणि इतर वेअरेबल गॅजेट्सच्या माध्यमातून गोपनीयतेला धोका निर्माण होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर गृह विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सुरक्षा यंत्रणा किंवा पोर्टल सुरू करण्याची मागणीही करण्यात आली, जेणेकरून अशा तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवता येईल.
या चर्चेला उत्तर देताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी पुढील 30 दिवसांत विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती 4 ते 6 महिन्यांत आपला अहवाल सादर करेल.
तसेच केंद्र सरकारही या तंत्रज्ञानावर धोरण तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य स्तरावर तातडीच्या उपाययोजनांसाठी विविध विभागांची संयुक्त यंत्रणा तयार करण्याचा सरकारचा विचार असून याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis