मराठी रंगभूमीच्या एका युगाचा अस्त - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई, १ जुलै (हिं.स.) : मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अ
मराठी रंगभूमीच्या एका युगाचा अस्त - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


मुंबई, १ जुलै (हिं.स.) : मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विजया मेहता यांनी आपल्या विलक्षण दिग्दर्शनशैली, सर्जनशील दृष्टी आणि रंगकलेप्रती असलेल्या अखंड निष्ठेच्या बळावर मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सक्षमपणे उभी करत त्यांनी मराठी नाट्यविश्वाला समृद्ध केले. त्यांची प्रत्येक कलाकृती ही आशय, शिस्त आणि कलात्मकतेचा उत्कृष्ट संगम होती असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

विजया मेहता यांचे संपूर्ण आयुष्य हे रंगभूमी, कलात्मकता आणि नव्या पिढीतील कलाकार घडविण्यासाठी समर्पित होते. त्यांचे कार्य, विचार आणि कलासाधना भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. विजया मेहता यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande