
दररोज केवळ तीन अत्यावश्यक नोंदी, उर्वरित माहिती आठवड्यातून एकदाच
अमरावती, 01 जुलै (हिं.स.)
राज्यातील शिक्षकांना विविध प्रकारचे अहवाल, आकडेवारी आणि प्रशासकीय माहिती सादर करण्याच्या दैनंदिन ताणातून मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 'माहितीचा वार शनिवार' या नव्या उपक्रमाअंतर्गत मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आता दररोज केवळ तीन अत्यावश्यक नोंदी कराव्या लागतील. उर्वरित सर्व माहिती आठवड्यातून एकदाच, शनिवारी सादर करावी लागणार आहे.यापुढे शाळांतील विद्यार्थी उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती आणि मध्यान्ह भोजनासंदर्भातील आवश्यक माहिती एवढीच माहिती दररोज सादर करावी लागेल. इतर सर्व अहवाल, विद्यार्थी आकडेवारी, योजनांची माहिती, सर्वेक्षणे आणि प्रशासकीय माहिती शनिवारी एकत्रितपणे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शिक्षकांकडून वारंवार मागविण्यात येणाऱ्या विविध ऑनलाइन अहवालांमुळे अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने केली जात होती. शासनाच्या या निर्णयामुळे अनावश्यक माहिती मागविण्यावर नियंत्रण येणार असून, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनासाठी अधिक वेळ देता येणार आहे.
या निर्णयाचा लाभ अमरावती जिल्ह्यासह राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील हजारो शिक्षकांना होणार असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांवर इतक्या अशैक्षणिक कामांचा बोजा
विविध योजनांचे ऑनलाइन अहवाल, विद्यार्थी व शाळांची आकडेवारी, सर्वेक्षण व पडताळणी, शासकीय पत्रव्यवहार व माहिती संकलन, विविध विभागांकडून वारंवार मागविली जाणारी माहिती, पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी शिक्षकांना पार पाडावी लागते. नव्या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी