
कराकास, 01 जुलै (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. देशाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होर्हे रोड्रिगेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपांतील मृतांची संख्या वाढून १,९४३ वर पोहोचली असून १० हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत.
सर्वाधिक प्रभावित भागांमध्ये सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच, मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी सशस्त्र दलाची तैनाती करण्यात आली आहे. वृत्तानुसार, विस्थापित कुटुंबांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली असून वैद्यकीय पथके जखमींवर उपचार करत आहेत.सोमवारी सकाळी व्हेनेझुएलाची राजधानी कराकास आणि ला ग्वायरा शहराजवळ ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. या धक्क्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी इमारतींमधून बाहेर पडून मोकळ्या जागांचा आश्रय घेतला.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. व्हेनेझुएलाच्या अधिकृत भूकंप संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, कॅरिबियन समुद्रात झालेल्या या भूकंपाचे केंद्र ला ग्वायरा राज्याच्या किनाऱ्यापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर होते. याच भागाला गेल्या बुधवारी झालेल्या ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपांचा सर्वाधिक फटका बसला होता. ताज्या आफ्टरशॉकची नोंद स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९.३० वाजता झाली. त्यामुळे आधीच भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली.
राजधानी कराकास आणि किनारपट्टीवरील ला ग्वायरा शहरात इमारती हादरू लागल्याने नागरिकांनी घरे आणि कार्यालये सोडून बाहेर धाव घेतली. अनेक जण इमारती आणखी कोसळण्याच्या भीतीने उद्याने, चौक आणि इतर मोकळ्या जागांमध्ये एकत्र जमले.मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सोमवारी झालेल्या भूकंपामुळे कोणतीही अतिरिक्त जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही.
राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होर्हे रोड्रिगेझ यांनी सांगितले, “देशाच्या कोणत्याही भागातून अतिरिक्त नुकसानीची माहिती मिळालेली नाही.” त्यांनी नागरिकांना शांत राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.बुधवारी झालेल्या दुहेरी भूकंपाच्या परिणामांमधून व्हेनेझुएला अजूनही सावरत असतानाच हा आफ्टरशॉक जाणवला. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नुकसानग्रस्त इमारतींपासून दूर राहण्याचे आणि बचाव पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, सरकारने आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केल्या असून किनारपट्टीवरील नागरिकांना संभाव्य त्सुनामीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उंच भागात स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode