
काबुल , 01 जुलै (हिं.स.)।
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावर्ती संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाच्या सैन्याने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांवर ताजे हवाई हल्ले केले असून या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानने पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) च्या तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केले होते.त्या हल्ल्यांत किमान २८ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे हल्ले बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान (आयएस-के) या दहशतवादी संघटनेच्या तळांवर करण्यात आले. अफगाणिस्तानचा दावा आहे की, या तळांवरून अफगाण नागरिकांवर हल्ल्यांचे कट रचले जात होते. त्यामुळे अत्यंत अचूक नियोजन करून हे हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईत दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले असून कोणत्याही सामान्य नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, असा दावाही अफगाणिस्तानने केला आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या लष्कराने सीमा ओलांडून आलेले चार साधे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची कोणतीही चिथावणीखोर कारवाई झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही पाकिस्तानने अफगाणिस्तानला दिला आहे.
दोन्ही देशांदरम्यान गेल्या ऑक्टोबरमध्ये युद्धविराम करार झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपर्यंत सीमाभागात तुलनेने शांतता होती. मात्र, ताज्या हवाई हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. यापूर्वीही यावर्षी फेब्रुवारी आणि जून महिन्यांत दोन्ही देशांमध्ये जोरदार गोळीबार आणि हवाई हल्ले झाले होते. या संघर्षांमध्ये दोन्ही बाजूंचे अनेक नागरिक, सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी ठार झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode