
तेहरान , 01 जुलै (हिं.स.)। पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कधी अमेरिका तर कधी इराण एकमेकांना सातत्याने इशारे देत आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला कठोर इशारा देत म्हटले आहे की, एमओयू (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग) मधील अटींची पूर्तता झाली नाही, तर ते युद्धासाठी तयार आहेत. इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि प्रमुख वाटाघाटीकार मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, अमेरिका करारातील आपली बांधिलकी पूर्ण करत नाही, तोपर्यंत अंतिम करारावरील चर्चा पुढे सरकणार नाही.
दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत गालिबाफ म्हणाले, “जर दुसऱ्या पक्षाने एमओयूचे पालन केले नाही, तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत.” त्यांनी अलीकडील संघर्ष संपवण्यासाठी झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेवर केला आणि पर्शियन आखातातील घडामोडींचाही उल्लेख केला. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा केंद्रबिंदू अंतिम करार नसून एमओयूमधील १४ कलमी कराराची अंमलबजावणी हा आहे.
गालिबाफ यांनी सांगितले की, एमओयूअंतर्गत इराणवरील नौदल नाकेबंदी हटवण्यात आली, ही इराणसाठी मोठी कूटनीतिक आणि आर्थिक उपलब्धी ठरली. त्यानंतर इराणने ४ कोटी बॅरलपेक्षा अधिक तेलाची निर्यात केली आहे.होर्मुझ सामुद्रधुनीवर इराण आणि ओमान या दोन्ही देशांचे सार्वभौमत्व असल्याचे गालिबाफ यांनी नमूद केले. एमओयूचा ६० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून इराण टोल आकारण्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघाई यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक होणार नाही. दोहामध्ये सुरू असलेल्या चर्चा या केवळ एमओयूच्या अंमलबजावणी आणि इराणची गोठवून ठेवलेली मालमत्ता (फ्रोजन ॲसेट्स) मुक्त करण्यासंबंधीच्या तांत्रिक बाबींवर केंद्रित आहेत. या राजकीय स्वरूपाच्या वाटाघाटी नाहीत.कतारनेही इराण आणि अमेरिका यांच्यात दोहामध्ये तांत्रिक स्तरावरील चर्चा सुरू असल्याची पुष्टी केली असून, सध्या कोणतीही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode