
वॉशिंग्टन, 15 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इशारा दिला की, इराणने पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्यास नकार दिल्यास अमेरिका पुढील आठवड्यापासून इराणमधील वीज प्रकल्प आणि पूल यांना लक्ष्य करेल. तसेच, तेहरानने वॉशिंग्टनसोबत करार करण्यात अपयश आल्यास त्यांच्याकडे काहीही उरणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी दावा केला की, चर्चा पुन्हा सुरू झाली नाही तर अमेरिका येत्या काही दिवसांत इराणविरुद्धची आपली लष्करी मोहीम अधिक तीव्र करेल. ते म्हणाले, “आम्ही काल रात्री त्यांच्यावर अतिशय जोरदार हल्ला केला. त्यानंतरच्या दिवशीही कठोर कारवाई करू आणि पुढील आठवड्यात त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी कठीण होईल. पुढील आठवड्यात वीज प्रकल्पांची पाळी येईल. जर त्यांनी चर्चेच्या टेबलावर येऊन वाटाघाटी केल्या नाहीत, तर त्यानंतर पुलांना लक्ष्य केले जाईल. आम्ही त्यांचे सर्व वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त करू.”
पश्चिम आशियात तणाव वाढलेला असताना आणि दोन्ही देश एकमेकांच्या ठिकाणांवर हल्ले करत असताना ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. वृत्तानुसार, अमेरिकन आणि इराणी प्रतिनिधींमध्ये संपर्क कायम आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, जोपर्यंत इराण होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवेल, तोपर्यंत चर्चेत प्रगती होऊ शकत नाही.
इराणविरुद्धची लष्करी कारवाई किती काळ सुरू राहील, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, ते हल्ले थांबवण्याचा निर्णय घेईपर्यंत ही मोहीम सुरू राहील. त्यांनी इराणमध्ये भूसेना पाठवण्याची शक्यताही पूर्णपणे नाकारली नाही. मात्र, इतर पर्यायांना प्राधान्य देण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सूचित केले. ट्रम्प म्हणाले, “काही वेळा भू-लष्करी कारवाईची गरज भासते, पण आमच्याकडे असे लोक आहेत जे आमच्या वतीने ती कारवाई करतील.”
तेहरानवर करारासाठी दबाव वाढवत ट्रम्प म्हणाले की, इराणने करार केला नाही तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. ते म्हणाले, “तुम्ही करार करणेच योग्य ठरेल. अन्यथा तुमच्याकडे कोणीही उरणार नाही.” ट्रम्प यांनी असेही सांगितले की, नागरिकांच्या जीवितहानीचा धोका कमी करण्यासाठी अमेरिका अत्यंत सावधगिरी बाळगत आहे. ते म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत सतर्क आहोत. पण मी स्पष्टपणे सांगितले आहे की, इराणने करार करणेच त्याच्या हिताचे आहे. अन्यथा त्यांच्याकडे काहीही उरणार नाही.”
यापूर्वी दिवसभरात अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दावा केला होता की, त्यांनी इराणी बंदरे आणि किनारी भागांमधून ये-जा करणाऱ्या जहाजांना लक्ष्य करत आपली नौदल नाकेबंदी पुन्हा सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode