पीओकेमध्ये निवडणुकांपूर्वी तणाव; आंदोलकांवर गोळीबार झाल्याचा दावा, ८ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद , 15 जुलै (हिं.स.)। पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) विधानसभा निवडणुकांपूर्वी परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत आहे. आंदोलकांवर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांकडून कठोर कारवाई केली जात असल्याचे आरोप होत आहेत. विरोधाचा आवाज दडपण्याचा प्र
पीओकेमध्ये निवडणुकांपूर्वी तणाव; आंदोलकांवर गोळीबार झाल्याचा दावा, ८ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद , 15 जुलै (हिं.स.)। पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) विधानसभा निवडणुकांपूर्वी परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत आहे. आंदोलकांवर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांकडून कठोर कारवाई केली जात असल्याचे आरोप होत आहेत. विरोधाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असून आंदोलकांवर गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या कारवाईत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक स्तरावर सांगितले जात आहे. दरम्यान, मुजफ्फराबाद येथे आज मोठ्या जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणूकविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रावलकोट आणि सुधनोती दरम्यान आंदोलकांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार या घटनेत ८ आंदोलकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.मोठ्या संख्येने आंदोलक मुजफ्फराबादकडे जाण्यासाठी जमले होते. त्यावेळी रावलकोट बसस्थानक परिसरात सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या तसेच गोळीबारही करण्यात आल्याचे वृत्त आहे. सरकारविरोधातील या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून निवडणूक व्यवस्थेविरोधात आंदोलन सुरू आहे. तेथील विधानसभेच्या एकूण ५३ जागांपैकी १२ जागा अशा काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव आहेत, जे पीओके मध्ये राहत नसून लाहोर, कराची आणि रावळपिंडीसारख्या पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास आहेत.आंदोलकांचा आरोप आहे की, या राखीव जागांच्या माध्यमातून इस्लामाबादमधील सरकार पीओके वर कठपुतळी सरकार लादते, जे त्यांना मान्य नाही. त्यामुळे या निवडणूक व्यवस्थेत बदल करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

पीओके मध्ये पाकिस्तान सरकारविरोधातील जनक्षोभ वाढत असून गेल्या ३६ दिवसांपासून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांचा दावा आहे की, या काळात ८० हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला असून शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट आणि मोबाईल सेवा खंडित करण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या दाव्यांचीही स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.पाकव्याप्त काश्मीरमध्ये २७ जुलै रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

आंदोलनाशी संबंधित शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अनेक भागांत इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असून मोबाईल नेटवर्कही खंडित करण्यात आले आहे. वीज आणि अन्नधान्याच्या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर होत असल्याचा आरोप असलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तेथील जनतेवरील दडपशाही थांबवण्याचे आवाहन भारताने पाकिस्तानला केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande