
इस्लामाबाद, 15 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील नारंग मंडी शहरात मंगळवारी रात्री दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. या अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला, तर अन्य २५ जण जखमी झाले.
वृत्तानुसार, हा अपघात सिधनवाली स्टॉपजवळील काला खटाई रोडवर घडला. लाहोरहून शकरगडकडे जात असलेली बस एका मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली. धडकेनंतर दोन्ही बस रस्त्यावर उलटत शेतात जाऊन पडल्या. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी लाहोर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode