अवैध घुसखोरी : देशभरात 13 ठिकाणी ईडीची छापेमारी
कारवाईदरम्यान डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त नवी दिल्ली, 16 जुलै (हिं.स.) : अवैध घुसखोरी घडवून आणणाऱ्या मोठ्या नेटवर्कवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणी ईडीने पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महारा
ई़डी  लोगो


कारवाईदरम्यान डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त

नवी दिल्ली, 16 जुलै (हिं.स.) : अवैध घुसखोरी घडवून आणणाऱ्या मोठ्या नेटवर्कवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणी ईडीने पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह 13 ठिकाणी ईडीने छापेमारी केली.

ईडीच्या माहितीनुसार, हे नेटवर्क बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश मिळवून देणे, त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच देशातील विविध भागांत त्यांना पोहोचवून रोजगाराची व्यवस्था करणे अशा कामांमध्ये सक्रिय होते.ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, छापेमारीची कारवाई पश्चिम बंगालमधील कोलकाता, उत्तर चोवीस परगणा, दक्षिण चोवीस परगणा आणि मुर्शिदाबाद; हरियाणातील बल्लभगड; उत्तर प्रदेशातील देवबंद; दिल्लीतील बाटला हाऊस, जामिया नगर आणि ओखला; तसेच महाराष्ट्रातील रायगड येथे करण्यात आली.तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली असून त्यांची तपासणी सुरू आहे. या नेटवर्कशी संबंधित अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून पुढील काळात अटक होण्याची शक्यता आहे.

ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे पुरावे

ईडीच्या तपासात काही ट्रस्टच्या माध्यमातून अवैध घुसखोरांना मदत केल्याचे पुरावे मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये ई-रिक्षा देणे तसेच रोख आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने उत्तर 24 परगणा येथील हरोरा अल जमैतुल इस्लामिया दारूल उलूम आणि लखनऊ येथील त्याच्या प्रादेशिक कार्यालयावरही छापा टाकला. लखनऊ कार्यालयातून 40 लाख रुपये रोख आणि 180 ग्रॅम सोन्याची नाणी जप्त करण्यात आली असून त्याबाबत समाधानकारक माहिती मिळालेली नसल्याचे ईडीने म्हटले आहे.

बनावट भारतीय कागदपत्रे तयार केल्याचा आरोप

ईडीच्या म्हणण्यानुसार, हे नेटवर्क आंतरराष्ट्रीय सीमेच्या मार्गाने रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसवणे, त्यांचे बेकायदेशीर पुनर्वसन करणे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसारखी बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून त्यांची ओळख बदलण्यात सहभागी होते.

तपासात काही एफसीआरए अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. या ट्रस्टना परदेशातून निधी मिळाल्याचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

एटीएसच्या एफआयआरवरून ईडीची कारवाई

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अवैध घुसपैठ नेटवर्कविरोधात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता. याच एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईच्या माध्यमातून अवैध घुसपैठ करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande