
नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी नीट-यूजी पेपरफुटी, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीसह विविध मुद्द्यांवर जोरदार गोंधळ घातला. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट-यूजी पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. या प्रकरणावर सभागृहात चर्चा करण्याची त्यांनी मागणी केली. विरोधकांच्या गोंधळादरम्यान सभापतींनी राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.
दरम्यान, लोकसभेतही विरोधी पक्षांच्या खासदारांनी नीट-यूजी पेपरफुटी, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. अनेक खासदार पोस्टर आणि बॅनर घेऊन सभागृहात आले होते. सातत्याने सुरू असलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अवघे सुमारे 12 मिनिटेच चालू शकले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.
विशेष म्हणजे, संसदेचे मान्सून अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत एकूण 19 बैठका प्रस्तावित आहेत. सरकार या अधिवेशनात आयकर सुधारणा विधेयक, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक आणि सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) दुरुस्ती विधेयकासह सात महत्त्वाची विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule