
वॉशिंग्टन , 16 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सद्भावनेच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. इराणने एका अमेरिकन महिलेची सुटका केल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही महिला डिसेंबर 2024 पासून, म्हणजेच सुमारे दीड वर्षांपासून, इराणच्या ताब्यात होती.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “इराणने एका अमेरिकन नागरिकाला देश सोडण्याची परवानगी दिली आहे. जो बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात डिसेंबर 2024 मध्ये तिला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले होते. ती आता सुरक्षितपणे इराणबाहेर आली असून तिची प्रकृती चांगली आहे. इराणच्या या सद्भावनापूर्ण पावलाचे अमेरिका स्वागत करते.”
या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही टीका केली. त्यांनी नमूद केले की, संबंधित महिलेची अटक बायडेन यांच्या कार्यकाळात झाली होती. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये त्या महिलेची ओळख उघड केली नाही किंवा तिच्या सुटकेच्या अटी व परिस्थितीबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती दिली नाही.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकील जेरेड गेन्सर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्या अमेरिकन महिलेचे नाव डीना करारी असल्याचे सांगितले. डीना करारी यांच्या सुटकेची पुष्टी करताना गेन्सर यांनी लिहिले, “माझी क्लायंट आणि अमेरिकन नागरिक डीना करारी, ज्या डिसेंबर 2024 पासून इराणमध्ये खोट्या आरोपांमुळे अडकून पडल्या होत्या, त्या आता मुक्त झाल्या आहेत, ही माहिती देताना मला अत्यंत आनंद होत आहे.”
जेरेड गेन्सर यांनी आपल्या पोस्टमध्ये या यशाचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना दिले. त्यांनी म्हटले, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्यपूर्ण आणि असामान्य प्रयत्नांशिवाय हे शक्य झाले नसते. डीना करारी आता सुरक्षित असून त्या आपल्या मायदेशी अमेरिकेत परतत आहेत.”
माध्यमांच्या अहवालानुसार, डीना करारी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर इराण सोडण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्या दीर्घकाळ इराणमधून बाहेर पडू शकल्या नव्हत्या.
दरम्यान, एका बाजूला ट्रम्प यांनी इराणच्या या पावलाचे कौतुक केले असले, तरी दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अलीकडील हल्ल्यांमध्ये इराणमध्ये 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode