
इस्लामाबाद, 20 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक संस्थेने माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या बहिणी नूरीन नियाझी यांना समन्स बजावले आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावर खोटी, अपमानास्पद आणि भडकाऊ सामग्री प्रसारित करून देशातील सरकारी संस्थांची बदनामी केल्याचा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप आहे. नियाझी यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना हे समन्स पाठवण्यात आले.
नॅशनल सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यांना समन्स पाठवून इस्लामाबाद येथील एजन्सीच्या कार्यालयात हजर राहून आपला जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. त्यांची मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.या मुलाखतीत नियाझी यांनी दावा केला होता की, मे २०२५ मध्ये झालेला लष्करी संघर्ष हा सैन्य नेतृत्वाची प्रतिमा उंचावण्यासाठी मुद्दाम घडवून आणण्यात आला होता. त्यांनी आरोप केला की हा संपूर्ण घटनाक्रम पूर्वनियोजित संगनमताचा भाग होता. तसेच, चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान भारताविरोधात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईचे महत्त्व कमी दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी म्हटले. कोणतेही ठोस पुरावे न देता त्यांनी असा दावाही केला की, पाकिस्तान इस्रायलला मान्यता देण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे भारताने संघर्ष अधिक तीव्र करण्याचे टाळले.
नियाझी यांच्या मते, या संपूर्ण घटनेचा उद्देश इस्लामाबादसाठी ‘अब्राहम अॅकॉर्ड्स’मध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा करणे हा होता. पाकिस्तान हा त्या देशांपैकी एक आहे ज्यांनी इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही आणि ज्यांचे इस्रायलशी कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. नियाझी यांच्या वक्तव्यांवर पंजाबच्या माहिती व संस्कृती मंत्री अझमा बुखारी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. बुखारी म्हणाल्या की, नूरीन नियाझी यांचे विधान हे त्यांच्या भाऊ इमरान खान यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. खान यांचे कुटुंब पाकिस्तानच्या यशस्वी कामगिरीबाबत नेहमीच अस्वस्थ राहिले आहे आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात करण्यात आलेल्या अशा टिप्पणी अत्यंत दुर्दैवी आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode