
लंडन , 20 जुलै (हिं.स.)।ब्रिटनच्या लेबर पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झालेल्या अँडी बर्नहॅम यांनी देशाचे नवे पंतप्रधानपद स्वीकारले आहे. ‘किंग ऑफ द नॉर्थ’ म्हणून ओळखले जाणारे बर्नहॅम हे कीअर स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे लोकलाडक्या धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिफॉर्म यूके पक्षाचा वाढता प्रभाव रोखणे. ब्रिटनमधील राजकीय घडामोडींमध्ये गेल्या दशकात देशाला सातवे पंतप्रधान मिळाले आहेत.
लेबर पक्षाचे ज्येष्ठ नेते अँडी बर्नहॅम यांची गेल्या शुक्रवारी पक्षाच्या नव्या नेत्यपदी निवड करण्यात आली. लेबर पक्षाच्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी (NEC) च्या अध्यक्षा शबाना महमूद यांनी लंडनमधील पक्षाच्या विशेष अधिवेशनात ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “केवळ एका खासदाराचे नामांकन आले होते, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.” दरम्यान, बर्नहॅम यांनी आपल्या निवडीला गेल्या ४० वर्षांतील ब्रिटनच्या राजकारणातील सर्वात मोठा बदल असे संबोधले.अँडी बर्नहॅम यांनी देशाची व्यवस्था नव्याने उभारण्याचा आणि सरकारचे लक्ष महागाई, वाढती जीवनावश्यक खर्चाची समस्या तसेच ढासळत चाललेल्या सार्वजनिक सेवांसारख्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कीअर स्टार्मर यांनी राजाला आपला औपचारिक राजीनामा सादर केल्यानंतर, राजा चार्ल्स तिसरे यांनी अँडी बर्नहॅम यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. १० डाउनिंग स्ट्रीटबाहेर निरोपाचे भाषण दिल्यानंतर स्टार्मर यांनी राजांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर सम्राटांनी बर्नहॅम यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले.
५६ वर्षीय बर्नहॅम हे ग्रेटर मँचेस्टरचे महापौर असताना ‘किंग ऑफ द नॉर्थ’ या नावाने प्रसिद्ध झाले होते. आता त्यांच्यासमोर आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक उपयुक्तता सेवा, तसेच मंदावलेली आर्थिक वाढ यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर मात करण्याचे मोठे आव्हान असेल.
पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या भाषणात बर्नहॅम “अधिक स्थिर आणि जबाबदार राजकारण” याची रूपरेषा मांडणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात देण्यात आली. आपल्या भाषणात ते म्हणणार आहेत की, हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. देशासमोरील आव्हाने प्रामाणिकपणे स्वीकारली पाहिजेत आणि केवळ राजकीय स्थैर्याद्वारेच लोकांच्या जीवनात खरा बदल घडवून आणता येईल.
बर्नहॅम यांनी असेही सांगितले की, ते राजकीय व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणतील, ज्यामुळे लोकांचे जीवनमान झपाट्याने उंचावेल आणि ब्रिटन असा देश बनेल जिथे “जीवन अधिक परवडणारे असेल आणि प्रत्येक व्यक्ती तसेच प्रत्येक प्रदेशाला प्रगतीची समान संधी मिळेल.”
बर्नहॅम यांचा संदेश लेबर पक्षातील खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरला. पक्षातील अनेक खासदारांचे मत आहे की, निगेल फॅराज यांच्या रिफॉर्म यूके पक्षाकडून निर्माण होत असलेल्या वाढत्या आव्हानाचा प्रभावी सामना करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी बर्नहॅम एक आहेत. त्यांचे म्हणणे होते की, लोकप्रियता गमावलेले कीअर स्टार्मर हे हे आव्हान प्रभावीपणे हाताळू शकले नसते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode