कर्करोग रुग्णालयाजवळील हवाई हल्ल्यानंतर तेहरानचा अमेरिकेला इशारा
तेहरान, 16 जुलै (हिं.स.)।पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. इराणने गुरुवारी देशाच्या नैऋत्य भागातील एका कर्करोग रुग्णालयाजवळ अमेरिकेने हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यानंतर रुग्णालय रिकामे करावे लागले. इराणन
कर्करोग रुग्णालयाजवळील हवाई हल्ल्यानंतर तेहरानचा अमेरिकेला इशारा


तेहरान, 16 जुलै (हिं.स.)।पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. इराणने गुरुवारी देशाच्या नैऋत्य भागातील एका कर्करोग रुग्णालयाजवळ अमेरिकेने हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यानंतर रुग्णालय रिकामे करावे लागले. इराणने या घटनेला “क्रूर आणि अमानुष हल्ला” असे संबोधले आहे. तसेच, वॉशिंग्टनने इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यास संपूर्ण प्रदेशातील पायाभूत व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा इशाराही तेहरानने दिला आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितले की, हवाई हल्ल्यांमुळे केमोथेरपी उपचार घेत असलेल्या 211 रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवावे लागले. त्यांनी अमेरिकेवर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये बकाई यांनी म्हटले की, हा क्रूर हल्ला आरोग्य सुविधांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांची आठवण करून देणारा आहे. या घटनेमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या निरपराध मुलांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव आणि वेदना सहन कराव्या लागल्या आहेत.

तणाव वाढत असताना इराणच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर अमेरिकेने इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याच्या धमक्या प्रत्यक्षात उतरवल्या, तर इराणी सशस्त्र दलांच्या कठोर प्रत्युत्तराखाली संपूर्ण प्रदेशातील पायाभूत व्यवस्था चिरडून टाकली जाईल.

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणखी गडद झाले आहे. इराणने अमेरिकेच्या नियंत्रणाखालील नौवहन मार्गांचा वापर करणाऱ्या जहाजांवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. या महत्त्वाच्या जलमार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असल्यास बळाचा वापर करण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. मात्र, लष्करी तज्ज्ञांच्या मते, यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करावे लागेल.

याचदरम्यान, इराणने गुरुवारी अमेरिकन लष्करी तळांना आश्रय देणाऱ्या बहरीन, जॉर्डन आणि कुवेत या देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. तथापि, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.दुसरीकडे, इराकचे पंतप्रधान अली अल-जैदी यांनी उत्तरेकडील इरबिल शहरात रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. विशेष म्हणजे, ही घटना त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान घडली. या दौऱ्यात त्यांनी इराणसमर्थक गटांसह इतर बिगर-राज्य सशस्त्र संघटनांचे निःशस्त्रीकरण करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याची भूमिका मांडली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष थांबविण्याचे प्रयत्न अद्याप निष्फळ ठरत आहेत. पाकिस्तानने वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात संवादाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी हेही मान्य केले की राजनैतिक तोडगा काढण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande