न्यूझीलंडमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप; सुनामीचा इशारा जारी
वेलिंग्टन, 16 जुलै (हिं.स.)।न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या पश्चिम किनारपट्टीवर गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना तातडीने सु
न्यूझीलंडमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप; सुनामीचा इशारा जारी


वेलिंग्टन, 16 जुलै (हिं.स.)।न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या पश्चिम किनारपट्टीवर गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू ते अनाउ शहराच्या उत्तर-उत्तरपश्चिमेस सुमारे 42 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के क्विन्सटाउन, मिलफोर्ड साउंड तसेच साउथलँड प्रदेशातील इतर भागांतही जाणवले. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने (एनइएमए) परिस्थितीचा आढावा घेत सुनामीचा संभाव्य धोका असल्याचा इशारा दिला आहे.

सुनामीच्या इशाऱ्यानंतर एनइएमए ने मिलफोर्ड साउंड ते प्युसेगुर पॉइंट या दरम्यानच्या किनारी भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले आहेत. एनइएमए ने नागरिकांना आवाहन करत म्हटले आहे की, “जर तुम्ही दक्षिण बेटाच्या किनाऱ्याजवळ असाल आणि तुम्हाला एक मिनिटापेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले असतील किंवा इतका तीव्र धक्का बसला असेल की उभे राहणे कठीण झाले असेल, तर कोणत्याही सायरनची वाट पाहू नका. त्वरित उंच आणि सुरक्षित ठिकाणी जा.”

तसेच प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनारे, बंदरे, नद्या आणि इतर जलमार्गांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. नागरी संरक्षण यंत्रणा किंवा अधिकृत यंत्रणांकडून सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना मिळेपर्यंत समुद्रकिनाऱ्यांवर किंवा रिकामे करण्यात आलेल्या भागांमध्ये परतू नये, असेही सांगण्यात आले आहे.अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की पुढील काही तासांपर्यंत असामान्य आणि धोकादायक समुद्री लाटा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाणे किंवा किनाऱ्यावर गर्दी करणे टाळावे.

न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियन आणि पॅसिफिक टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमारेषेवर वसलेला देश आहे. येथे अनेक सक्रिय आणि सुप्त ज्वालामुखी असल्यामुळे भूकंपाची शक्यता कायम असते. याच कारणामुळे न्यूझीलंडचा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांमध्ये समावेश होतो. दक्षिण बेटावरील सर्वात मोठे शहर क्राइस्टचर्च 2011 मध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले होते. त्या दुर्घटनेत 185 जणांचा मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande