पश्चिम बंगाल : रेल्वेची शाळेच्या वाहनाला धडक, तिघांचा मृत्यू
मुर्शिदाबाद, 17 जुलै (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात शाळेच्या वाहनाला प्रवासी रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच विद्यार्थी गंभीर जखम
मुर्शिदाबाद रेल्वे अपघातात चेंदामेंदा झालेले वाहन


मुर्शिदाबाद, 17 जुलै (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात शाळेच्या वाहनाला प्रवासी रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार हा अपघात पूर्व रेल्वेच्या सियालदह विभागांतर्गत मुर्शिदाबादमधील बहरामपूर पोलीस ठाणे हद्दीत कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लेव्हल क्रॉसिंगवर घडला. मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि एका सायकलस्वाराचा समावेश आहे. तर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका खासगी शाळेचे वाहन विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना उघड्या असलेल्या रेल्वे फाटकातून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या निमतिता–काटोया प्रवासी रेल्वेने वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

अपघाताच्या वेळी वाहनात चालकासह 8 जण प्रवास करत होते. स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अप लाईनवरील एक रेल्वे गेल्यानंतर फाटक उघडण्यात आले; मात्र दुसऱ्या मार्गावरून रेल्वे येत असतानाही फाटक बंद करण्यात आले नाही, त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर रेल्वे गेटमनच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून वाहनात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सर्व जखमींना प्रथम कर्णसुबर्ण ब्लॉक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande