
अहमदाबाद, 17 जुलै (हिं.स.) : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख बिलाल आबिद शेरा, मोहम्मद अयूब कडीवाल उर्फ मोहम्मद खडियासन, मोहम्मद शफी मुखी उर्फ शफी चापी, मोहम्मद हसन क. राडिया उर्फ हसन हैदरपुरी आणि मोहम्मद अयूब सुमासरा उर्फ मोहम्मद खली अशी करण्यात आली आहे. गुजरात एटीएसकडून प्राप्त माहितीनुसार, हे संशयित पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्यांचा संबंध यापूर्वी देशातील विविध भागांतून अटक करण्यात आलेल्या 8 दहशतवाद्यांशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद गुजरातमध्ये स्लीपर सेल तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. विशेषतः उत्तर गुजरातमधील काही व्यक्तींना संघटनेशी जोडून दहशतवादी कारवायांसाठी जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक हर्ष उपाध्याय यांनी सांगितले की, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आठ संशयितांच्या संपर्कात असलेल्या या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संशयितांच्या हालचाली आणि संपर्कांची चौकशी करण्यात येत आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी